
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी गटात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षाच्या कार्यकारिणीत महत्त्वाचे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कार्यकारिणीची सुधारित यादी सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या यादीत काही नवख्या चेहऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवून ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता असल्याने पक्षात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या महिन्यात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे नसल्याने मोठी चर्चा रंगली होती. दोन्ही बड्या नेत्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा सूर राजकीय वर्तुळात उमटला होता. त्यानंतर पक्षाकडून ही केवळ तांत्रिक चूक असल्याचे सांगण्यात आले होते. आता ही चूक दुरुस्त करण्यासाठी सुधारित यादी आयोगाकडे पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान कार्यकारिणीतील सना मलिक, सुबोध मोहिते आणि प्रजापती या तिघांची नावे वगळली जाऊ शकतात. त्याऐवजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळू शकते. मात्र पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीतही पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आल्याची माहिती आहे. बैठकीदरम्यान सुनील तटकरे यांनी पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर स्वतःसह प्रफुल्ल पटेल यांनाच वारंवार लक्ष्य करण्यात आल्याची खंत व्यक्त केली. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आम्ही भूमिका घेतली, मात्र कठीण प्रसंगी आमच्या समर्थनासाठी कोणी पुढे आले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे.
या वेळी मंत्री छगन भुजबळ यांनी चर्चा पुढे न वाढवण्याचा सल्ला दिला. मात्र तटकरे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडत स्पष्टता हवीच, असा आग्रह धरल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. सुधारित कार्यकारिणीत नेमकी कोणाला संधी मिळते आणि पक्ष नेतृत्व कोणता संदेश देते, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



