Home क्रीडा सेंसाई अतुल लोहार यांना ब्लॅक बेल्ट 2nd Dan बहाल

सेंसाई अतुल लोहार यांना ब्लॅक बेल्ट 2nd Dan बहाल

0
36


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कराटे आणि मार्शल आर्ट्स क्षेत्रात चोपडा शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी सेंसाई अतुल बी. लोहार यांनी केली आहे. पुणे येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ब्लॅक बेल्ट परीक्षेत त्यांनी यश संपादन करत ब्लॅक बेल्ट 2nd Dan मानांकन प्राप्त केले. या यशामुळे क्रीडा आणि मार्शल आर्ट्स क्षेत्रात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दि. २४ मे २०२६ रोजी पुणे येथे बिनोरीयो कराटे दो असोसिएशन, पुणे यांच्या आयोजनाखाली ओकीनावा मार्शल आर्टस् अकॅडेमी आणि जापन कराटे शोतोकाई इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या कराटेपटूंमध्ये सेंसाई अतुल लोहार यांनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि तांत्रिक प्रावीण्य दाखवत ब्लॅक बेल्ट 2nd Dan पदवी मिळवली.

या यशानंतर ओकीनावा मार्शल आर्टस् अकॅडेमी व जापन कराटे शोतोकाई इंडिया मान्यताप्राप्त ब्लॅक बेल्ट 2nd Dan म्हणून सेंसाई अतुल लोहार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बिनोरीयो कराटे दो असोसिएशन महाराष्ट्राचे संस्थापक, अध्यक्ष आणि मार्गदर्शक शिहान दत्ता शेलार सर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या यशाचे कौतुक केले.

ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी ज्ञानेश्वर सोनवणे सर आणि सेंसाई मुकेश कथवटे सर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच सेंसाई विजय पवार यांनी परीक्षेचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. सेंसाई समीर शेलार, सेंसाई बालाजी कुंभार यांच्यासह इतर प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करून त्यांच्या तयारीत मोलाचे योगदान दिले.

यावेळी ओकीनावा मार्शल आर्टस् अकॅडेमी व जापन कराटे शोतोकाई इंडिया यांचे मुख्य शैली प्रमुख एस. श्रीनिवासन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मार्शल आर्ट्समुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, मानसिक ताकद आणि स्वसंरक्षणाची भावना विकसित होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी देखील कराटेसारख्या क्रीडा प्रकारामुळे युवकांना सकारात्मक दिशा मिळत असल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound