Home Cities जळगाव म्हैस व पाड्यांच्या कायदेशीर वाहतुकीबाबत एकता संघटनेचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

म्हैस व पाड्यांच्या कायदेशीर वाहतुकीबाबत एकता संघटनेचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात जनावरांच्या वाहतुकीच्या मुद्द्यावरून निर्माण होणारा सामाजिक तणाव, सोशल मीडियावरील अफवा आणि कायदा हातात घेण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगावातील एकता संघटनेने पोलीस प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. म्हैस आणि नर पाड्यांच्या कुर्बानीसाठी कायदेशीर वाहतुकीबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी एकता संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासाठी संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधीमंडळाने अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या प्रतिनिधीमंडळात हाफिज रहीम पटेल, जिया बागवान, मतीन पटेल, आरिफ देशमुख आणि रज्जाक पटेल यांचा समावेश होता. निवेदनात महाराष्ट्रातील विद्यमान कायद्याचा उल्लेख करत गोवंशाची कुर्बानी आणि त्यांची वाहतूक कायद्याने प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच मुस्लिम समाजानेही कायद्याचा आदर राखत अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

एकता संघटनेने निवेदनात पुढे नमूद केले की, महाराष्ट्रातील प्रचलित कायद्यांनुसार म्हैस आणि नर पाड्यांच्या कुर्बानीसाठी आवश्यक वैध कागदपत्रांसह आणि शासकीय नियमांचे पालन करून वाहतूक करणे कायदेशीर आहे. त्यामुळे समाजात निर्माण होणाऱ्या संभ्रमाला पूर्णविराम मिळावा आणि अफवांमुळे तणावाचे वातावरण तयार होऊ नये, यासाठी प्रशासनाने स्पष्ट माहिती जाहीर करणे आवश्यक असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

फैजपूर पोलीस ठाण्यात २४ मे रोजी दाखल झालेल्या प्रकरणाचाही यावेळी उल्लेख करण्यात आला. संबंधित वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हशींची वाहतूक केल्याने कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर म्हशींच्या कुर्बानीवरही बंदी घालण्यात आल्याच्या अफवा पसरल्याने मुस्लिम समाजात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा मुद्दा संघटनेने प्रशासनासमोर मांडला.

जिल्हाभरात स्पष्ट एसओपी जाहीर करून कोणती वाहतूक वैध आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि कोणत्या परिस्थितीत कारवाई केली जाईल, याबाबत प्रशासनाने नागरिकांना अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यामुळे अफवांना आळा बसेल आणि कायद्याबाबत जनतेमध्ये स्पष्टता निर्माण होईल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनीही प्रतिनिधीमंडळाशी चर्चा करत कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात येणाऱ्या म्हशींच्या वाहतुकीवर किंवा कुर्बानीवर कोणतीही सर्वसाधारण बंदी नसल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रशासनाच्या वतीने कोणतीही अडचण निर्माण केली जाणार नसून सर्वांनी शांतता राखत कायद्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. एकता संघटनेनेही मुस्लिम समाजाला आवाहन करत भीती आणि अफवांपासून दूर राहण्याचे सांगितले. कायद्याचे पालन करत शांतता, बंधुता आणि सामाजिक जबाबदारी जपत बकरी, म्हैस आणि पाड्यांची कुर्बानी करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


Protected Content

Play sound