
चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः केळी पिके आडवी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून अनेक गावांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

अडावद, धानोरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपिटीचीही नोंद झाली असून त्यामुळे शेतातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने उभे केलेले पीक अक्षरशः जमिनीवर कोसळल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे पंचक येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले, तर खर्डी येथे घरांवर झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे. तसेच बिडगाव, वरगव्हाण, खर्डी, लोणी, पंचक या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे आणि गटविकास अधिकारी अंजली बरगे यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही गावांमध्ये दोन ते तीन दिवसांपासून वीज नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून महिला व लहान मुलींना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत आमदार सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून तात्काळ सूचना देत बंद असलेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेश दिले. प्रशासनानेही नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
वादळी पाऊस, गारपीट आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने चोपडा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व ग्रामस्थांकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



