
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशातील संसदेतील उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना जाहीर झाला असून सलग दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाल्याने जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसदेतील सक्रिय सहभाग, लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी मांडणीच्या जोरावर स्मिताताई वाघ यांनी राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. या घोषणेनंतर जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून खासदार वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियंदर्शिनी राहुल यांनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करताना सांगितले की, २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत संसदेतील सदस्यांच्या कामगिरीचा सखोल अभ्यास करून ज्युरी समितीने विजेत्यांची निवड केली आहे. संसदीय कामकाजातील सहभाग, चर्चांमधील अभ्यासपूर्ण भूमिका, जनहिताच्या विषयांवरील सातत्य आणि उपस्थिती या निकषांच्या आधारे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जातो.
खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत विविध लोकहिताचे प्रश्न सातत्याने मांडत जळगाव जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विषय प्रभावीपणे मांडले आहेत. अभ्यासपूर्ण भूमिका आणि स्पष्ट मांडणीमुळे त्यांनी संसदेतील चर्चांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत संसदेत सक्रिय उपस्थिती राखल्यामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असल्याचे मानले जात आहे.
यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळाले आहे. राज्यातील पाच खासदारांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून त्यामध्ये श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, हेमंत सावरा, स्मिता वाघ तसेच राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संसदीय प्रतिनिधित्वाची ताकद यंदा विशेषपणे अधोरेखित झाली आहे.
खासदार स्मिताताई वाघ यांच्या या यशामागे त्यांची जिद्द आणि लोकसेवेप्रती असलेली निष्ठा विशेष ठळकपणे समोर आली आहे. सध्या त्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही त्यांनी संसदेतील कामकाजात सातत्य ठेवले आहे. केमोथेरपीचे उपचार सुरू असतानाही त्यांनी संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहून जळगावच्या जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे आणि चिकाटीचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.
सलग दुसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाल्याने खासदार स्मिताताई वाघ यांच्या संसदीय कारकिर्दीला आणखी एक महत्त्वाचा मान मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात असून सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



