
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरालगतच्या हरिता-सरीता नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पुलावर सुरक्षेसाठी आवश्यक असलेले कठडे नसल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर असताना या पुलावरील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन पुलावर मजबूत कठडे उभारावेत, अशी जोरदार मागणी यावलकर नागरिकांकडून होत आहे.

यावल शहराला लागून असलेल्या हरिता-सरीता नदीच्या पात्रात काही वर्षांपूर्वी हा पूल उभारण्यात आला होता. शहरातील विविध भागांना जोडणारा हा पूल नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग बनला आहे. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षेसाठी आवश्यक असलेले कठडेच नसल्याने पुलावरून ये-जा करताना वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना मोठा धोका पत्करावा लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना थेट नदीचे पात्र असल्याने थोडीशी निष्काळजीपणा किंवा वाहनाचा तोल गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. परिसरातील विद्यालये, बालवाडी, लहान मुलांच्या शाळा, शासकीय आयटीआय तसेच सूतगिरणीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कर्मचारी वर्ग याच मार्गाचा वापर करतात. सकाळ-संध्याकाळ या पुलावरून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत सुरक्षेची कोणतीही भक्कम व्यवस्था नसणे ही चिंतेची बाब ठरत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत या पुलावरील धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसात पुलावर पाणी साचणे, रस्ता निसरडा होणे आणि दृश्यमानता कमी होणे अशा परिस्थितीत कठडे नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक तीव्र होऊ शकतो. विशेषतः शाळकरी मुले, दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या कठड्यांची उभारणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.



