Home Cities चोपडा उत्तमनगरात तीव्र पाणीटंचाई ; पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांचे हाल

उत्तमनगरात तीव्र पाणीटंचाई ; पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांचे हाल


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील लासूर-सत्रासेन परिसरातील उत्तमनगर या आदिवासी पाड्यावर भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने आणि पर्यायी साधनेही बंद पडल्याने सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या या पाड्यावर पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या समस्येकडे ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

लासूर-सत्रासेन परिसरात जंगलाच्या कुशीत वसलेल्या उत्तमनगर पाड्यावर बहुसंख्य आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. जंगलातील मजुरी, शेतीची किरकोळ कामे आणि रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांचे जीवन आधीच संघर्षमय आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. तापमानाचा पारा चढत असताना पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उत्तमनगरमध्ये यापूर्वीही पाणीटंचाईचा गंभीर अनुभव ग्रामस्थांनी घेतला होता. सुमारे आठ वर्षांपूर्वी दूषित पाणी पिल्याने दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर तत्कालीन आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विशेष प्रयत्न करून तातडीने पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनीही पुढाकार घेत पाण्याची टाकी उभारून दिली होती. या सुविधेमुळे नळाद्वारे गावात पाणीपुरवठा सुरू झाला होता. मात्र सध्या वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संपूर्ण व्यवस्था कोलमडली असून पाण्याची टाकी रिकामी पडली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून ज्या रोहित्रावरून पाड्यावरील ट्यूबवेलला वीजपुरवठा केला जातो, त्या रोहित्राचा रॉड नादुरुस्त झाल्याने वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी ट्यूबवेल बंद पडली असून पाण्याची टाकी भरता येत नाही. त्यामुळे गावातील नळांमधून पाणी येणे बंद झाले आहे. भर उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट ठरत असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना दूरवर जावे लागत आहे.

यात आणखी गंभीर बाब म्हणजे जिल्हा परिषदेकडून बसविण्यात आलेल्या दोन हातपंपांपैकी दोन्ही हातपंप सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडे पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायच उरलेला नाही. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्याने ग्रामस्थ प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहेत.

दरम्यान, पाड्यावर उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरला सिंगल फेज वीजजोडणी उपलब्ध आहे. त्या वीजजोडणीवर सिंगल फेज मोटर सुरू करून काही प्रमाणात पाणी काढले जात आहे. याच एकमेव साधनावर सध्या संपूर्ण पाड्यावरील ग्रामस्थ, गुरेढोरे आणि बकऱ्यांची तहान भागवली जात आहे. मात्र ही व्यवस्था अत्यंत अपुरी ठरत असून तातडीने रोहित्र दुरुस्ती करून हातपंपही कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Protected Content

Play sound