
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जात असतानाच, दुसरीकडे भरदिवसा तीन मोठ्या वृक्षांची विनापरवाना तोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदर्श शाळेबाहेरील या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शहरातील आदर्श शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचे काही सजग नागरिकांच्या निदर्शनास आले. यानंतर नागरिकांनी तात्काळ ‘पर्यावरण संवर्धन व विकास समिती’चे जिल्हाध्यक्ष Devendra Varade तथा अप्पा आणि तालुकाध्यक्ष Pawan Nale यांना माहिती दिली. माहिती मिळताच समितीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण प्रकाराची पाहणी केली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला. नगरपालिका अधिकारी धनराज बाविस्कर यांना “आदर्श शाळेला वृक्षतोडीसाठी कोणती परवानगी देण्यात आली आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बाविस्कर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नगरपालिकेकडून शहरात कोणालाही वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.
नगरपालिकेने परवानगी दिलेली नसताना भरदिवसा ही वृक्षतोड नेमकी कोणाच्या आशीर्वादाने करण्यात आली, असा संतप्त सवाल उपस्थित नागरिकांनी केला आहे. देवेंद्र वराडे, पवन नाले तसेच इतर पर्यावरणप्रेमींनी या घटनेमागील जबाबदार व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या वृक्षतोडीमुळे शहराच्या हरित पट्ट्यावर मोठा परिणाम झाला असून, पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. वाढते तापमान आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर झाडांचे संवर्धन आवश्यक असताना अशा प्रकारे बेकायदेशीर वृक्षतोड होणे अत्यंत गंभीर असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, संबंधितांवर त्वरित कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पर्यावरण संवर्धन व विकास समितीकडून देण्यात आला आहे. शहरातील पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज असल्याचेही पर्यावरणप्रेमींनी नमूद केले.



