Home आरोग्य महादेव हॉस्पिटलमुळे वाचले संपादकाचे प्राण

महादेव हॉस्पिटलमुळे वाचले संपादकाचे प्राण


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “घाम खूप येतोय… खांदा दुखतोय… छातीत असह्य वेदना होत आहेत…” सकाळी आलेला हा फोन केवळ मदतीसाठी नव्हता, तर मृत्यूशी सुरू असलेल्या झुंजीचा आर्त आवाज होता. मात्र योग्य वेळी घेतलेला निर्णय, डॉक्टरांची तत्परता आणि जळगावातील महादेव हॉस्पिटलच्या सज्जतेमुळे एका संपादकाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे एका गंभीर हृदयविकाराच्या झटक्यातून रुग्णाला अक्षरशः नवजीवन मिळाले.

जळगाव शहरातील महादेव हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेल्या हृदयविकार तपासणी शिबिरादरम्यान ही थरारक घटना घडली. सकाळी साडेआठच्या सुमारास जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांच्या मोबाईलवर संपादक निलकंठ वाणी यांचा फोन आला. फोनवरील आवाज अत्यंत घाबरलेला होता. अंगातून प्रचंड घाम येत होता, खांदा आणि छातीत तीव्र वेदना सुरू होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत राहुल कुलकर्णी यांनी क्षणाचाही विलंब न करता ही हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असल्याचे ओळखले आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये येण्याचा सल्ला दिला.

दुसरीकडे, रुग्णालयाचे प्रशासक एन. जी. चौधरी यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत तातडीने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली. रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धेश खांदे यांनी तातडीने ईसीजी तपासणी केली. अहवाल पाहताच रुग्णाला गंभीर स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आणि रक्तदाब नियंत्रणात आल्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली.

अँजिओग्राफीमध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी तब्बल ९९ टक्के ब्लॉक असल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी वेळ न दवडता तातडीने अँजिओप्लास्टी केली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष बाब म्हणजे त्या वेळी रुग्णाच्या खिशात उपचारासाठी एक रुपयाही नव्हता. मात्र शासनाच्या आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देत संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले.

या घटनेनंतर रुग्णाच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. काही मिनिटे उशीर झाला असता तर परिस्थिती वेगळी असती, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मृत्यूच्या दारातून परत आलेले निलकंठ वाणी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “डॉक्टर हे देवाचं रूप असतं, असं म्हणतात आणि ते आज प्रत्यक्ष अनुभवलं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने डॉक्टर देवदूत बनून आले आणि माझा जीव वाचवला. महादेव हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांचे मी मनापासून आभार मानतो.”

डॉ. सिद्धेश खांदे यांनी सांगितले की, छातीत वेदना, खांद्यात दुखणे आणि जास्त घाम येणे ही हृदयविकाराच्या झटक्याची महत्त्वाची लक्षणे आहेत. रुग्णाला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आल्यामुळेच मोठा अनर्थ टळला. ईसीजीमध्ये गंभीर हृदयविकाराचा झटका स्पष्ट दिसून आला होता. अँजिओग्राफीमध्ये मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉक असल्याचे समोर आले. तातडीने अँजिओप्लास्टी करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला आणि आता रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली.


Protected Content

Play sound