
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पश्चिम क्षेत्र वनविभागाच्या गस्ती पथकाने अवैध कोळसा वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख रुपये किमतीचा कोळसा आणि ट्रक जप्त केला आहे. वाहतुकीसंदर्भातील आवश्यक परवानगी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनविभागाने ही धडक कारवाई केली. दरम्यान, चौकशीदरम्यान ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने या प्रकरणात अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावलच्या पश्चिम व हरिपुरा वन विभागाचे गस्ती पथक नियमित गस्त घालत असताना यावल-किनगाव मार्गावर संशयास्पदरीत्या कोळसा वाहतूक करणारा एमएच १९ सीएक्स ४१४९ क्रमांकाचा ट्रक आढळून आला. वाहनाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने वनविभागाच्या पथकाने ट्रक थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर वन अधिकाऱ्यांनी चालकाकडे कोळसा वाहतुकीसाठी आवश्यक असलेले परवाने व कागदपत्रांची मागणी केली. मात्र, चालकाकडे कोणतीही वैध परवानगी अथवा पास उपलब्ध नसल्याचे समोर आले. अधिक चौकशी सुरू असतानाच चालक घाबरून घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे वनविभागाने तातडीने ट्रक ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली.
वन विभागाच्या पथकाने अंदाजे १० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ४ लाख रुपये किमतीचा कोळसा जप्त करून यावल येथील मुख्य विक्री केंद्रात जमा केला आहे. या प्रकरणी हरिपुरा येथील वनपाल संजय इंडे यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम ४१ (२) ब आणि कलम ४२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
ही कारवाई यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक सौरीष सहाय, प्रादेशिक व कॅम्पा सहाय्यक वनरक्षक समाधान पाटील तसेच यावल पश्चिम वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हरिपुरा परिमंडळाचे वनपाल संजय इंडे, वनरक्षक सुधीर पटणे, योगेश मुंडे, श्रीमती सरला भोंगरे आणि वनसेवकांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली



