Home Uncategorized गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्तेत आघाडीवर

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्तेत आघाडीवर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बी.एस्सी. नर्सिंग प्रथम सत्राच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे. नुकताच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत यशाची परंपरा कायम राखली असून, संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव वाढवला आहे.

या परीक्षेत पायल चंद्रिकापूरे हिने ७६.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गौरी प्रवीण धावले आणि संस्कृती राहुल पुनवतकर यांनी ७४.८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अक्षदा अरविंद गावित, मयुरी दिनकर कोळी आणि शर्ली स्टिव्हेन्सन यांनी ७२.८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच ऋषिकेश राजेश्वर गुंड यांनी ७१.२ टक्के गुणांसह चौथा क्रमांक मिळविला, तर तृप्ती पुरुषोत्तम करंगळे हिने ७०.८ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणविर तसेच प्राध्यापक वर्ग आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासातील चिकाटी आणि प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक प्रशिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवत असून, संस्थेची गुणवत्ता अधिक अधोरेखित होत आहे. यंदाच्याही निकालाने महाविद्यालयाच्या उत्कृष्ट शैक्षणिक परंपरेला नवी उंची मिळाल्याचे बोलले जात आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीचे प्रयत्न पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, आगामी काळातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound