जळगाव. लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमालीचे वाढले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनना गटनेते विष्णू भंगाळे यांनी महापौर दिपमाला काळे यांना काल विशेष निवेदन सादर केले. शहरात भटक्या कुत्र्यांचे तात्काळ निर्बीजीकरण करण्यात यावे आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. याप्रसंगी यांनी निवेदन देताना नगरसेवक गणेश सोनवणे, हर्षल मावळे, ऍड. दिलिप पोकळे आदी उपस्थित होते.
शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, रात्री-अपरात्री रस्त्यावरून चालणे किंवा दुचाकी चालवणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शहरात एकाच दिवशी तब्बल १० जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे जळगावकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये यामुळे प्रचंड घबराट पसरली आहे.

विष्णू भंगाळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने या समस्येकडे दुर्लक्ष न करता तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात आणि गल्लीबोळात जाऊन भटक्या कुत्र्यांचा शोध घ्यावा व त्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवावी. तसेच, जे कुत्रे पिसाळलेले आहेत, त्यांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा. प्रशासनाने यावर लवकरच ठोस कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



