Home Cities जळगाव पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनवाढ निश्चित – जिल्हाधिकारी रोहन घुगे 

पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनवाढ निश्चित – जिल्हाधिकारी रोहन घुगे 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खानदेशातील पशूपालन व्यवसाय अधिक सक्षम आणि उत्पन्नवर्धक करण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. पशुसंवर्धन दिनानिमित्त जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यशाळेत पशुपालन क्षेत्रातील विविध योजनांची माहिती देत ग्रामीण भागातील पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे तसेच पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत पशुसंवर्धन विभागामार्फत आता अधिक व्यापक आणि परिणामकारक योजना राबविल्या जात आहेत. पशूपालन हा व्यवसाय आव्हानात्मक असला तरी तो शेतीला पूरक असा महत्त्वाचा जोडधंदा ठरू शकतो. स्वतःला पशूपालनाचा अनुभव असल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केवळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता शेळीपालन, मेंढीपालन आणि कुक्कुटपालनासारखे व्यवसाय स्वीकारावेत, असे आवाहन केले. जळगाव जिल्ह्यात समृद्ध शेती आणि पोषक वातावरण असल्यामुळे पशुपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शासकीय योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाच्या योजना तळागाळातील पशुपालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना प्रकाशझोतात आणण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. पशुपालनाला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी या योजनांचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.


Protected Content

Play sound