मुंबई- वृत्तसेवा । राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या बातम्या समोर येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही ठिकाणी इंधन संपल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील इंधन साठा आणि पुरवठा व्यवस्थेबाबत स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जागतिक परिस्थिती आव्हानात्मक असली तरी राज्यातील पुरवठा साखळी व्यवस्थित सुरू आहे. केंद्र सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा स्ट्रॅटेजिक साठा उपलब्ध असून, त्याचा पुरवठा देखील नियमितपणे होत आहे. मात्र नागरिकांमध्ये निर्माण होणारी अनाठायी भीती हीच पुरवठा व्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलची पुरवठा साखळी ही वर्षानुवर्षे ठराविक मागणीच्या आधारावर उभी राहिलेली असते. एखाद्या शहरात किंवा तालुक्यात दररोज आणि दरमहा किती इंधनाची गरज असते, यानुसार वितरणाचे नियोजन केले जाते. परंतु अचानक अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करू लागले, तर पुरवठा साखळीवर अतिरिक्त ताण निर्माण होतो आणि तात्पुरती विस्कळीत स्थिती निर्माण होते.
यावेळी त्यांनी उदाहरण देत सांगितले की, जसे एखाद्या बँकेत सर्व ग्राहकांनी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यास सुरुवात केली तर बँकेची व्यवस्था ताणली जाते, त्याचप्रमाणे परिस्थिती इंधन पुरवठ्याबाबत देखील निर्माण होते. त्यामुळे घाबरून जाऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. नागरिकांनी इंधनाचा वापर काळजीपूर्वक करावा आणि अफवांना बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा एक महिन्याचा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, इंधन पुरवठ्याचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जागतिक पातळीवरील परिस्थितीमुळे निर्माण झालेला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात काही भागांमध्ये निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असले तरी शासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी संयम राखत आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



