जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील सहकार क्षेत्रातील वर्ग-१ चे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी आणि जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी देविदास धनसिंग पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. तक्रारदाराला अवैध सावकारीच्या चौकशीत अनुकूल अहवाल देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती ३ लाख रुपये ठरवून त्यातील १ लाख ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना देविदास पाटील याला रंगेहात अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार यांच्यावर अवैध सावकारी कायद्यांतर्गत कारवाई झाली असून, त्याची सुनावणी उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव येथे सुरू होती. या चौकशी प्रकरणाचा अहवाल तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध न पाठवता तो अनुकूल पाठवण्यासाठी उपनिबंधक जगदीश बारी (वय ५६) याने ५ लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी याबाबत जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली.

एसीबीने १८ मे रोजी केलेल्या पडताळणी दरम्यान धक्कादायक बाब समोर आली. “तुम्ही मागच्या प्रकरणात वकील लावून आमचे मोठे नुकसान केले, म्हणूनच मी नकारात्मक अहवाल दिला होता. आता अनुकूल अहवाल देतो,” असे सांगत बारी याने ३ लाख रुपयांवर तडजोड केली आणि पहिला हप्ता देविदास पाटील (वय ४४) या खाजगी इसमाकडे देण्यास सांगितले.
आज २० मे २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने बी. जे. मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात सापळा रचला. जगदीश बारीच्या सांगण्यावरून देविदास पाटील याने तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.



