जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध आणि वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने नुकतीच पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक व कारखानदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वाढत्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन विविध मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कारखान्यांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी सर्व कंपन्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यान्वित ठेवणे, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमणे, कारखाना परिसरास मजबूत कंपाउंड वॉल उभारणे आणि प्रवेश-निर्गमन नियंत्रण प्रणाली काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.
दुर्घटना आणि अमली पदार्थांना प्रतिबंध :
औद्योगिक परिसरात होणारे वाहतूक अपघात आणि औद्योगिक दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. कामगारांना नियमित सुरक्षा प्रशिक्षण देणे आणि अग्निसुरक्षा उपाययोजना अद्ययावत ठेवण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. महाराष्ट्रातील काही औद्योगिक भागांमध्ये अमली पदार्थांच्या वाढत्या हालचाली पाहता, जळगाव एमआयडीसी परिसरातही याबाबत कमालीची सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अनोळखी व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्लॅकमेलिंगविरुद्ध कठोर इशारा आणि नियोजन :
या बैठकीत पोलीस प्रशासनाने उद्योजकांना मोठा धीर दिला आहे. औद्योगिक परिसरात कोणतेही आंदोलन किंवा संघटनात्मक हालचाली होणार असल्यास त्याची माहिती पोलिसांना आधीच देणे गरजेचे आहे. उद्योगांना ब्लॅकमेलिंग किंवा दबावतंत्राद्वारे त्रास देण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला. जळगावच्या आर्थिक विकासासाठी भयमुक्त वातावरण आवश्यक असून, सर्व कामगारांचे चारित्र्य पडताळणी करणे आणि अतिक्रमण रोखणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, एमआयडीसीने वाहन उपलब्ध करून दिल्यास सशस्त्र पोलिसांसह प्रभावी नाईट पेट्रोलिंग सुरू करण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली.
समन्वय आणि जनजागृतीवर भर :
पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली ही बैठक प्रामुख्याने प्रतिबंधात्मक आणि जनजागृतीपर उपक्रमाचा एक भाग होती. उद्योग क्षेत्र आणि पोलीस प्रशासन यांच्यात उत्तम समन्वय निर्माण करून सुरक्षित आणि गुन्हेमुक्त औद्योगिक वातावरण तयार करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. प्राणघातक रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांसाठी विशेष कार्यशाळा देखील आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठकीस एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नामवंत उद्योजक आणि पोलीस विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



