Home प्रशासन गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक  

गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक  


मुंबई-वृत्तसेवा । मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील डिझेलवर चालणाऱ्या बोटी आता टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतरित करण्यात येणार असून हरित पर्यावरण आणि इंधन बचतीच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी बोट मालकांना मुंबई बँकेमार्फत आर्थिक सहाय्य आणि विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

पंतप्रधान Narendra Modi यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंत्री नितेश राणे आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार Pravin Darekar यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गेटवे परिसरातील पारंपरिक डिझेल बोटींचे आधुनिकीकरण करून त्यांना इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाशी जोडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सध्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात 97 लायसन्सधारक लाकडी बोटी कार्यरत आहेत. या बोटी डिझेलवर चालत असल्याने बोट मालकांना दरमहा सुमारे एक लाख रुपयांपर्यंत इंधन खर्च करावा लागत असल्याचे समोर आले आहे. वाढते इंधन दर आणि पर्यावरणीय समस्या लक्षात घेता प्रवासी तसेच मच्छिमारी बोटींचे इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्यासाठी विशेष योजना राबविण्याची गरज असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत नमूद केले.

इलेक्ट्रिक बोटींची किंमत अंदाजे 2.5 कोटी ते 6 कोटी रुपयांपर्यंत असल्याने मत्स्य संस्था, खासगी बोट मालक, वैयक्तिक लाभार्थी आणि बोट असोसिएशनसाठी कमी व्याजदरातील विशेष कर्ज योजना तयार करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी मुंबई बँकेला दिले आहेत. या माध्यमातून बोट मालकांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 25 लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या पाच जणांना प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक बोटींकरिता स्वतंत्र विशेष पॉलिसी तयार करून ती आगामी संचालक मंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील कोळी बांधवांचे पारंपरिक व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत असताना पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक जलपर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या उपक्रमामुळे समुद्रातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून भविष्यात मुंबईच्या पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, इलेक्ट्रिक बोटींच्या वापरामुळे इंधन खर्चात मोठी बचत होणार असून पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मुंबई महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. कोळी समाज, पर्यटन व्यवसाय आणि पर्यावरण या तिन्ही घटकांसाठी हा उपक्रम लाभदायी ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound