जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पोलीस प्रशासनासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत बकरी ईद सण शांततापूर्ण, सौहार्दपूर्ण आणि नियमांचे पालन करून पार पडावा यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य विभाग, महावितरण, अग्निशमन, पशुसंवर्धन व परिवहन विभागांनी आपल्या तयारीचा आढावा सादर केला.

जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एसआरपीएफ जवान आणि होमगार्ड पथकेही नियुक्त करण्यात येणार आहेत. संवेदनशील भाग, प्रमुख चौक, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या परिसरात विशेष गस्त वाढविण्यात आली आहे. “गुड मॉर्निंग स्क्वॉड” सतर्क करण्यात आले असून समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
सोशल मीडियावर अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकनाके सक्रिय करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. बैठकीत गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याबाबतही माहिती देण्यात आली. उघड्यावर कत्तल किंवा मांस विक्री न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवून प्रशासनास सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



