जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागून असलेली जळगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून देणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली असून यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडून जाणाऱ्या विधानपरिषदेच्या जागा देखील २०२२ सालापासून प्रलंबीत होत्या. मध्यंतरी नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या असल्या तरी काही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या होत्या. यात जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश होता. यामुळे विधानपरिषदेची निवडणूक होणार की नाही ? याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. तथापि, आज राज्य निवडणूक आयोगाने १६ विधानपरिषदेच्या जागांची निवडणूक जाहीर केली असून यात जळगावचा देखील समावेश आहे.

जळगावातून आधी चंदूलाल पटेल हे विधानपरिषदेवर प्रतिनिधीत्व करत होते. आता त्यांना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहरा समोर येणार ? याची उत्सुकता लागणार आहे. तर, या निवडणुकीसाठी नवनियुक्त नगरपालिका, नगरपंचायत व महापालिकेच्या नगरसेवकांसह लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना मतदानाचा हक्क असेल. तर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क नसेल हे स्पष्ट झाले आहे. संख्याबळाचा विचार करता महायुतीला निर्णायक बहुमत असल्याने महायुतीचाच आमदार होणार असल्याचे स्पष्ट आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी निकाल लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.



