


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील मोंढाळा रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगात असलेल्या नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी झाल्याने गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ मे रोजी घडली आहे. धोंडू बुधो पाटील (वय ६० वर्षे, रा. मोंढाळा, ता. भुसावळ) असे मयत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडू पाटील हे आपल्या ताब्यातील अप्पे रिक्षा (एमएच १९ एई ८०९६) घेऊन किन्ही ते मोंढाळा रस्त्याने जात होते. पेट्रोल पंपाजवळ आले असता, रिक्षेचा वेग जास्त होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रिक्षा भरधाव वेगाने चालवली जात असल्याने अचानक चालकाचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले. परिणामी, रिक्षा रस्त्यावरच जोरात पलटी झाली. या अपघातात धोंडू पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास बाविस्कर हे करीत आहे.



