जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। शहरातील प्रसिद्ध सराफा बाजार परिसरात एका चांदीच्या कारागिराला काळ्या रंगाच्या शॉक मशीनने इलेक्ट्रिक करंट देऊन बेशुद्ध करण्याचा आणि जबरी चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १६ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत वंसत भामरे (वय ४१ वर्षे, रा. आर.एल. कॉलनी, साईबाबा मंदिराजवळ, गांधी नगर, जळगाव) हे चांदीचे कारागीर आहेत. जळगाव येथील बालाजी पेठ, रथ चौक भागातील ‘आर.एल. ज्वेलर्स’ शोरुमच्या मागे असलेल्या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर भामरे यांचे काम चालते. १६ मे रोजी दुपारी ते आपल्या कामात व्यस्त असताना, एका अज्ञात आरोपीने इमारतीत प्रवेश केला.

त्या अज्ञात इसमाने भरत भामरे यांच्या जवळ येत, आपल्या जवळील काळ्या रंगाच्या एका उपकरणाने (मशीनने) त्यांना इलेक्ट्रिक करंट दिला. भामरे यांना बेशुद्ध करून त्यांच्या जवळील दागिने जबरीने चोरी करण्याचा चोरट्याचा इरादा होता. मात्र भरत यांनी केलेल्या प्रतिकारामुळे किंवा सतर्कतेमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला. ही घटना घडल्यानंतर अज्ञात चोरट्यांने पळ काढला. याबाबत भरत भामरे यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



