फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील सिंधी समाज मंदिर गोदडीवाला धाम येथे १४ आणि १५ मे रोजी दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या मंगलमयी सोहळ्यात साई झूलेलाल बाबा, हरदासराम बाबा आणि गेलाराम बाबा यांच्या नयनरम्य मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण फैजपूर शहरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच १४ मे रोजी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत सिंधी समाजासह शहरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, १५ मे रोजी सकाळी ११ वाजता जळगाव दरबारचे साई देविदास साई यांच्या शुभहस्ते आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात मूर्ती प्रतिष्ठापना विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भुसावळचे साई सुनील बाबा उदासी, श्री महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज आणि श्री महामंडलेश्वर पवनदासजी महाराज उपस्थित होते. संत-महंतांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि महाभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. सायंकाळी ४ वाजता या दोन दिवसीय सोहळ्याची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांतील प्रमुख मान्यवर मंडळींनी येथे हजेरी लावली होती.



