Home Cities जळगाव निर्माल्य संकलन रथाचे महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

निर्माल्य संकलन रथाचे महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत जळगाव महानगरपालिकेने ‘समर्पण’ संस्थेच्या संयुक्त सहकार्याने “निर्माल्य संकलन व व्यवस्थापन प्रकल्प” सुरू केला आहे. शहरातील मंदिरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या निर्माल्याचे शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते विशेष निर्माल्य संकलन रथाचे उद्घाटन करण्यात आले.

शनिवार, दि. १६ मे रोजी रथ चौक येथील ऐतिहासिक आणि प्राचीन श्रीराम मंदिर संस्थान येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते निर्माल्य संकलन रथाचे पूजन करण्यात आले. यानंतर हा रथ श्रीराम मंदिर संस्थान येथून जुने जळगावातील विठ्ठल मंदिर तसेच शहरातील विविध मंदिरांकडे मार्गस्थ झाला. धार्मिक भावना जपत पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत ‘पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा’ निर्माल्याचे पावित्र्य राखून त्यापासून सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प राबविणार आहे. गोळा होणाऱ्या निर्माल्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून पर्यावरणपूरक खत तयार करण्याचा मानस आहे. यासाठी आवश्यक जनजागृती, नियोजन, संकलन आणि प्रक्रिया व्यवस्थापनात ‘समर्पण’ संस्था जळगाव महानगरपालिकेला सहकार्य करत आहे.

या प्रसंगी स्थानिक नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, सुनील खडके, स्थायी समिती सदस्य कल्पेश सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, पियूष कोल्हे, अमित काळे, स्वीकृत नगरसेवक नरेंद्र सोनवणे, हर्षल मावळे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील तसेच ‘समर्पण’ संस्थेच्या चेतना नन्नवरे, पोलीस प्रभाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे, संदीप ढंढोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंदिरांमध्ये जमा होणारे निर्माल्य अनेकदा नदी, नाले किंवा कचऱ्यात फेकले जात असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. ही समस्या लक्षात घेऊन निर्माल्याचे पावित्र्य राखत त्याचे उपयुक्त सेंद्रिय खतात रूपांतर करण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महापालिकेचा निर्माल्य संकलन रथ नियमितपणे शहरातील विविध मंदिरांमधून निर्माल्य गोळा करणार असून नागरिकांनी आणि मंदिर प्रशासनाने निर्माल्य इतरत्र न टाकता निर्धारित ठिकाणी जमा करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


Protected Content

Play sound