धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीवर मागील दोन वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात नराधम शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते. ती जि.प. शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा तिला शाळा भरण्यापूर्वी सकाळी १० वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेत असे. शाळा रिकामी असल्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्ये करायचा. इतकेच नव्हे, तर तिला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण करत असे. या प्रकाराला विरोध केल्यास तो तिला मारहाण करायचा आणि कोणाला सांगितल्यास “तुझे आई-वडील मरून जातील,” अशी धमकी देऊन तिला गप्प बसवत असे.

शाळा सुटल्यानंतर सुट्यांमध्ये मुलगी आपल्या मावशीकडे गेली असता, तिथे तिची तब्येत बिघडली आणि तिने जेवण करणे बंद केले. नातेवाईकांनी तिला विश्वासात घेतले असता, तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. ३० एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशीही या नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांनी आरोपी नंदलाल मराठे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून, अशा नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.



