
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय घडामोडी, आगामी सण-उत्सव तसेच विविध महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथींच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात १५ मे ते २९ मे २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, विनापरवानगी सभा, मिरवणुका आणि जमावबंदीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७ (१) व (३) नुसार हे आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, १५ मे २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हे निर्बंध प्रभावी राहणार आहेत.
या कालावधीत शस्त्रे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड किंवा तत्सम वस्तू जमा करणे, सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक घोषणा देणे, आक्षेपार्ह हावभाव करणे तसेच व्यक्तींच्या प्रतिमांचे दहन करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनापरवानगी सभा, मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, विवाह समारंभ आणि प्रेतयात्रा यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे.



