जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढत्या फेटल अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेण्यात आली. या बैठकीत दोन्ही अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशन प्रभारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच हायवे स्टेट पॅट्रोलचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील वाढत्या अपघातांची कारणे, मृत्यूंचे प्रमाण आणि त्यावरील उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एमआयडीसी परिसरातील ट्रक चालकांसाठी विशेष वर्कशॉप आयोजित करण्यात येणार असून गावांमधील ट्रॅक्टर चालकांनाही वाहतूक नियमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महामार्गालगतच्या ढाबे व हॉटेल चालकांना अपघातानंतर तातडीने मदत कशी करावी, सीपीआरसारखे प्राथमिक उपचार कसे द्यावेत याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणांबाबत NHAI आणि PWD कडे पाठवलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लग्नसराईत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई, महामार्गावर साईडला उभ्या ट्रकांवर दंडात्मक कारवाई तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
अपघातग्रस्तांना बहुतांश वेळा खासगी वाहनांतून हलवले जात असल्याचे निदर्शनास आल्याने वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यावरही भर देण्यात आला. प्रत्येक पोलिस वाहनात फर्स्ट एड बॉक्स ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून जनजागृती मोहिमेलाही गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.



