Home क्राईम पाळीव कुत्र्याच्या चाव्यामुळे ९ वर्षीय बालकाचा रेबीजने मृत्यू ; मालकावर गुन्हा दाखल

पाळीव कुत्र्याच्या चाव्यामुळे ९ वर्षीय बालकाचा रेबीजने मृत्यू ; मालकावर गुन्हा दाखल


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नारायण नगर भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, एका पाळीव कुत्र्याने चावा घेतल्यामुळे ९ वर्ष ६ महिने वयाच्या बालकाचा रेबीज होऊन मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी भावना विशाल झोपे यांचा मुलगा तारुष हा नेहमीप्रमाणे गजानन महाराज मंदिराजवळ दर्शनासाठी गेला होता. तो दर्शन घेऊन परतत असताना, शेजारी राहणारे प्रकाश उर्फ खन्ना एकनाथ कोळी यांच्या घरातील एका ब्राऊन रंगाच्या हिंस्त्र कुत्र्याने गेटमधून बाहेर येत तारुषवर अचानक झेप घेतली. कुत्र्याने तारुषच्या चेहऱ्यावर, नाकावर आणि डोळ्यावर गंभीर चावा घेतला, ज्यामुळे तो रक्तबंबाळ झाला होता.

तक्रारीनुसार, प्रकाश कोळी यांनी त्यांच्या कुत्र्याला रेबीज प्रतिबंधक लस टोचली नव्हती. कुत्रा हिंस्त्र आहे हे माहित असतानाही त्याला साखळी न लावता किंवा मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी मोकळे सोडले होते. कुत्र्याच्या हल्ल्यावेळी कोळी यांनी बालकाला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. गंभीर जखमांमुळे आणि रेबीजची लागण झाल्यामुळे उपचारादरम्यान तारुषचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Protected Content

Play sound