जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना जळगाव शहरात पावसाचे पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला वेग दिला आहे. बुधवारी महापौर दीपमाला काळे यांनी मेहरुण परिसरातील नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. शहरातील मुख्य नाले आणि उपनाल्यांची वेळेत साफसफाई पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
पावसाळ्यात शहरातील विविध भागांत पाणी साचण्याच्या समस्या वारंवार उद्भवत असल्याने यंदा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. महापौर दीपमाला काळे यांनी पाहणीदरम्यान नाल्यांमधील गाळ, कचरा आणि अडथळे तातडीने हटवून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या सूचनेनंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

सहाय्यक उपायुक्त उदय पाटील आणि मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांत नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. मेहरुण परिसरातील लहान-मोठ्या नाल्यांची जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजीनगर भागात साचलेला गाळ आणि कचरा उपसण्याचे काम करण्यात आले. प्रभाग क्रमांक १२ मधील रामदास कॉलनी परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम राबवून नालेसफाई पूर्ण करण्यात आली.
महानगरपालिकेकडून या मोहिमेसाठी सहा जेसीबी आणि एक पोकलँड यंत्राची मदत घेण्यात आली आहे. शहरातील मुख्य जलनिस्सारण मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी यंत्रसामग्रीसह मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांनाही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन केले आहे.
या पाहणी दौऱ्यात महापौर दीपमाला काळे यांच्यासह उपमहापौर मनोज चौधरी, स्थानिक नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, गणेश सोनवणे, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे आणि समीर बोरोले उपस्थित होते. सर्वांनी विविध भागातील कामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
“शहरात कुठेही पावसाचे पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पावसाळापूर्व नालेसफाईचे काम वेळेत आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत,” असे महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले.



