Home Uncategorized पूर्णा नदीपात्रात गाळ काढण्यावरून वाद; पोकलेन चालकावर प्राणघातक हल्ला

पूर्णा नदीपात्रात गाळ काढण्यावरून वाद; पोकलेन चालकावर प्राणघातक हल्ला


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा गावाजवळ पूर्णा नदीच्या पात्रात गाळ काढण्याचे काम करणाऱ्या एका पोकलेन चालकावर १० ते १२ जणांच्या बेकायदेशीर जमावाने भीषण हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पोकलेन मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भूपेंद्र राधेश्याम मोहिते (वय २२, रा. शाहपूर, मध्य प्रदेश) हे पोकलेन चालक म्हणून कार्यरत आहेत. ते मुक्ताईनगर जवळील पूर्णा नदीपात्रात गाळ काढण्याचे काम करत असताना, आरोपी इक्बाल पटेल, शरीफ पटेल, अकील पटेल, साहेबजाद पटेल आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर १० जणांनी तिथे येऊन मज्जाव केला. “ही जागा आमची आहे, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून इथे गाळ काढत आहात?” असा सवाल करत आरोपींनी वाद घातला.

चालक मोहिते यांनी “माझे मालक अक्षय मनोहरलाल जयस्वाल यांना तहसील कार्यालयाकडून हे काम मिळाले आहे, तुम्हाला अडचण असल्यास त्यांच्याशी बोला” असे सांगताच आरोपींचा राग अनावर झाला. बेकायदेशीर जमाव जमवून आरोपींनी मोहिते यांना शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी पोकलेन मशीनवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडून नुकसान केले आणि “पुन्हा इथे काम करताना दिसलात तर जिवंत मारून टाकू,” अशी धमकी देऊन पळ काढला. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound