जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य – सक्षम परिचारिका जीव वाचवतात” या यंदाच्या जागतिक संकल्पनेनुसार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य परिचारिका अधीक्षक कार्यालयासमोर आयोजित या कार्यक्रमात परिचारिकांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव करण्यात आला.
आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी बनविण्यात परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांच्या समर्पण, अथक परिश्रम आणि मानवतावादी दृष्टिकोनाचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर आधुनिक परिचारिका सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी परिचारिका वर्गाच्या सेवाकार्याचे कौतुक करताना सांगितले की, रुग्णसेवेत परिचारिकांची भूमिका ही डॉक्टरांइतकीच महत्त्वाची आहे. संकटकाळात आणि आपत्कालीन परिस्थितीतही परिचारिका अविरतपणे सेवा देत असतात. त्यांच्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात कुशल, प्रशिक्षित आणि सशक्त परिचारिकांचे आरोग्य व्यवस्थेतील योगदान अधोरेखित करण्यात आले. परिचारिका या केवळ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या नसून रुग्णांना मानसिक आधार देणाऱ्या संवेदनशील सेविका असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. आरोग्य क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना सामोरे जाताना परिचारिकांची भूमिका अधिक व्यापक आणि जबाबदारीची बनत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.



