Home क्राईम किरकोळ कारणावरून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्यात पडलेल्या वाळूवरून बैलगाडी नेल्याच्या रागातून सहा जणांनी मिळून एकाच कुटुंबातील सदस्यांना लोखंडी रॉड आणि चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना खडकी बायपास परिसरात घडली. या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाल्मीक पांडुरंग जाधव (वय ४७, रा. खडकी बायपास) हे १२ मे रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास आपल्या बैलगाडीवर शेतातून चारा घेऊन घरी परतत होते. यावेळी रस्त्यावर असलेल्या रेतीवरून त्यांची बैलगाडी गेल्यामुळे आरोपींसोबत त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी जाधव कुटुंबावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात वाल्मीक जाधव यांचा मुलगा धर्मराज याच्या डोक्यावर आणि हातावर लोखंडी रॉडने गंभीर वार करण्यात आले. एवढेच नव्हे तर, आरोपींनी वाल्मीक यांचा मोठा मुलगा, पत्नी आणि मुलगी यांनाही चापटबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या झटापटीत कुटुंबातील सदस्यांना शारीरिक इजा झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अशोक अर्जुन केदार, आबा अशोक केदार, प्रकाश अशोक केदार, कल्पना आबा केदार, रत्ना अशोक केदार आणि रेखाबाई प्रकाश केदार अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound