जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यास झालेल्या विलंबामुळे आजोबांना रात्रभर नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन विभागाबाहेर बसावे लागल्याने संतापाची लाट उसळली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा गावातील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य विभागामार्फत पोलिओ डोस व लसीकरण मोहिम राबविण्यात येत होती. याच ठिकाणी सचिता दीपक बोरसे या अडीच महिन्यांच्या बालिकेला पोलिओ डोस आणि लस देण्यात आली. मात्र लस दिल्यानंतर काही मिनिटांतच तिची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर बालिकेला मृत घोषित केले.

या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. सचिताचे वडील दीपक दगा बोरसे हे भारतीय सैन्यात आयोध्या येथे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला.
मात्र त्यानंतर घडलेला प्रकार अधिकच धक्कादायक ठरला. रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास आजोबा तुळशीदास शिवदास मराठे हे नातीचा मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचले. नातेवाईकांच्या आरोपानुसार, त्या वेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास टाळाटाळ केली. परिणामी, निष्पाप चिमुकलीचा मृतदेह मांडीवर घेऊन आजोबांना रात्रभर शवविच्छेदन विभागाच्या गेटबाहेर बसून राहावे लागले.
पहाटे हा संपूर्ण प्रकार तेथे उपस्थित नागरिकांच्या निदर्शनास आला. आजोबा मांडीवर नातीचा मृतदेह घेऊन बसल्याचे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. या घटनेची माहिती पसरताच रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आणि अखेर मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला.
“शवविच्छेदन रात्री करू नका, एवढीच आमची विनंती होती. पण माणुसकी म्हणून तरी माझ्या नातीचा मृतदेह शवपेटीत ठेवायला हवा होता. रात्रभर मी माझ्या नातीला मांडीवर घेऊन बसलो, पण कुणालाही दया आली नाही,” असे म्हणताना आजोबा तुळशीदास मराठे यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या वेदनादायी शब्दांनी उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले.
दरम्यान, पोलिओ डोस दिल्यानंतर बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत चौकशीची मागणी होत आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नातेवाईकांनी संबंधित आरोग्य यंत्रणा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



