फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील नागरिकांना नियमित, सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा मिळावा यासाठी नगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत लोहरा ते फैजपूर मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइनवरील गळती दुरुस्तीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. अनेक दिवसांपासून पाइपलाइनमधील गळतीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
लोहरा ते फैजपूर दरम्यानच्या मुख्य पाइपलाइनमध्ये तब्बल २० ते २५ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती आढळून आली होती. या गळतीमुळे शहरात अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता, तर काही भागांत अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. परिस्थितीची गंभीर दखल घेत नगरपालिका प्रशासनाने संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे आदेश देत दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.

सदर मोहिमेत पाइपलाइनमधील सर्व गळतींची जोडणी व दुरुस्ती केली जाणार असून पाण्याचा अपव्यय रोखण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच पाइपलाइन मार्गावरील एकूण ३५ एअरवालपैकी १५ नवीन एअरवाल बसविण्यात येणार आहेत. उर्वरित २० एअरवालची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर भविष्यात शहरातील नागरिकांना नियमित आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
फैजपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. दामिनी पवन सराफ यांनी निवडणुकीदरम्यान शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील अपूर्ण विकासकामेदेखील प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत नगरपालिका प्रशासन शहर विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कामासाठी पाणीपुरवठा सभापती जयश्री नरेंद्र चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे सहकार्य लाभत असल्याचे नगराध्यक्षा दामिनी सराफ यांनी स्पष्ट केले. आगामी काळात शहरातील विविध विकासकामांना अधिक गती देण्यात येणार असून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



