Home प्रशासन नगरपालिका प्रभाग क्रमांक ०९मध्ये नगरसेवकाची स्वखर्चातून मोफत फवारणी मोहीम

प्रभाग क्रमांक ०९मध्ये नगरसेवकाची स्वखर्चातून मोफत फवारणी मोहीम


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रभाग क्रमांक ०९ मध्ये नगरसेवक विजयकुमार रायभान भोसले यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून संपूर्ण प्रभागात मोफत फवारणी मोहीम राबवली. नगर परिषदेकडून शहरात फवारणीचे काम सुरू असले तरी एकाच वेळी संपूर्ण शहरात फवारणी करणे शक्य नसल्याने नागरिकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.

प्रभागातील विविध भागांमध्ये डासांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही मोहीम राबवण्यात आली. फवारणी मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

नगरसेवक विजयकुमार भोसले यांनी नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत कोणतीही प्रतीक्षा न करता स्वखर्चाने ही मोहीम सुरू केली. प्रभागातील गल्लीबोळ, सार्वजनिक ठिकाणे, नाले परिसर आणि रहिवासी भागांमध्ये विशेष फवारणी करण्यात आली. यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील सर्व भागात एकाच वेळी फवारणी करणे प्रशासनासाठी शक्य नसल्याचे लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर जनहिताचा निर्णय घेतल्याचे भोसले यांनी सांगितले. तसेच, आगामी काळात नगरपालिकेकडून पुन्हा संपूर्ण प्रभागात अधिक व्यापक स्वरूपात फवारणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नागरिकांनी स्वच्छता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

ही जनहिताची मोहीम दमदार आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound