जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात शांतता आणि एकतेचा संदेश देत भाजप अल्पसंख्याक मोर्च्याने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. शहरातील दंगलग्रस्त कॉलनी परिसरात आयोजित एका विशेष कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते वृक्षरोपण आणि वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. याच सोहळ्यात भाजप अल्पसंख्याक मोर्च्याच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी वसीम खान यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र व सन्मान स्मरणिका देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमामुळे परिसरातील अल्पसंख्याक बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपच्या या नव्या कार्यकारिणीमुळे पक्ष विस्ताराला मोठी गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार राजूमामा भोळे यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, “दंगलग्रस्त कॉलनी ही ओळख पुसून आता हा परिसर ‘अब्दुल कलाम नगर’ म्हणून ओळखला जाईल. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे संपूर्ण देशाचे आदर्श आहेत, त्यांच्या नावामुळे आणि आदर्शांमुळे या भागाला नवीन प्रेरणा व नवसंजीवन मिळेल.” भाजप हा जात-पात न मानता सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष असून, विकासाच्या मुख्य प्रवाहात सर्वांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या घोषणेनंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात स्वागत केले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेक मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले. वसीम खान यांच्या निवडीमुळे अल्पसंख्याक समाजात पक्षाची पकड अधिक घट्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष वसीम खान यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, “पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेल. भाजपच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी मी अधिक वेगाने काम करेल.” सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
या सोहळ्याला भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षरोपण करून पर्यावरणाचा संदेश देण्यासोबतच, वाचनालयाच्या माध्यमातून तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



