भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्तक्षेपानंतर घंटागाड्यांच्या डिझेल पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आज रात्रीपासून शहरातील कचरा संकलनाचे काम पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती भाजपच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत नगरपरिषदेतील राजकीय घडामोडी, स्वच्छता व्यवस्थेतील बिघाड आणि प्रशासनातील अस्थिरता यावर जोरदार टीका करण्यात आली. शासनाने नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत त्यांना अपात्र घोषित केल्याने नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या निर्णयाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या नियमानुसार नगराध्यक्ष अपात्र ठरल्यानंतर तात्पुरता पदभार उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे यांच्याकडे देणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या राजकीय अस्थिरतेमुळे प्रशासन दिशाहीन झाल्याचा आरोप त्यांनी केला. नियमित मुख्याधिकारी राजेंद्र फातले हे महिनाभराच्या रजेवर असल्याने प्रशासन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शहरातील कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाड्यांचे डिझेल संपल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले होते. नगरपरिषदेची देयके थकित असल्याने पेट्रोल पंप चालकाने डिझेल पुरवठा थांबविला होता. तसेच स्वच्छतेचे काम करणाऱ्या सह्याद्री कंपनीनेही काम बंद केले होते. यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचा आरोप भाजपने केला.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच भाजप नगरसेवकांनी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर सावकारे यांनी तातडीने संबंधित पेट्रोल पंप चालकासोबत चर्चा करून डिझेल पुरवठा सुरू करण्यासाठी विश्वास दिला. त्यानंतर पंप चालकाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आजपासून साफसफाईचे काम पुन्हा सुरू होणार असून पुढील ७२ तासांत शहरातील कचरा संकलन पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी आरोप केला की, मागील आठ वर्षांत सुरळीत सुरू असलेली घंटागाडी व्यवस्था सत्ताधाऱ्यांनी उद्ध्वस्त केली. यापूर्वी शहराला ‘माझी वसुंधरा’ योजनेत स्वच्छतेबाबत पुरस्कार मिळाला होता. मात्र, नव्या सत्ताधाऱ्यांनी सक्षम व्यवस्था बदलून संपूर्ण नियोजन कोलमडवून टाकल्याने आज शहराला अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावरही भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले. नगरसेवक गिरीश महाजन यांनी शैलैजा नारखेडे या अनुभवी नगरसेविका असून शहराच्या विकासासाठी सक्षमपणे काम करू शकतात, असे स्पष्ट केले. लेवा पाटीदार समाजातील मुलगी आणि सून म्हणून त्यांचे शहराशी घट्ट नाते असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी सांगितले की, २०१६ मध्ये शहरात घाणीचे साम्राज्य होते. भाजप सत्तेत आल्यानंतर स्वतःच्या खर्चाने अनेक वार्डांत घंटागाड्या सुरू करून शहराला स्वच्छतेत नावारूपाला आणले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांत सत्ताधाऱ्यांनी विकासकामे आणि स्वच्छतेची व्यवस्था पूर्णतः कोलमडवून टाकल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी सांगितले की, मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या कचरा प्रश्नावर मंत्री सावकारे आणि गटनेते युवराज लोणारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मागील ठेकेदाराला पुन्हा काम सुरू करण्यासाठी तयार केले आहे. त्यानुसार आता शहरातील स्वच्छता व्यवस्थेला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, नगरसेवक राजेंद्र आवटे, किरण कोलते, गिरीश महाजन, प्राची उदय पाटील, महेंद्रसिंग ठाकूर, पिंटू कोठारी, प्रकाश बतरा, आशिष पटेल, संतोष चौधरी, सोनल महाजन तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



