जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, कालपर्यंत राज्यभरातून तब्बल 7 लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी भाग-1 भरून नोंदणी पूर्ण केली आहे.
विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सूचना व माहितीनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित कॅप फेऱ्या, ‘ओपन टू ऑल’ चौथी फेरी तसेच मुलींसाठी विशेष पाचवी फेरी आयोजित करण्यात येणार आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची शून्य फेरी सुरू केली असून, या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरता येणार आहे. 11 मे ते 13 मे या कालावधीत विद्यार्थी अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरू शकतील. यामध्ये व्यवस्थापन, अल्पसंख्यांक आणि संस्थांतर्गत कोट्याबाबत माहिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असेल. तसेच विद्यार्थ्यांना किमान एक ते कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत.
तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 14 ते 15 मे दरम्यान प्रसिद्ध होणार असून, त्यावर 16 मे रोजी हरकती नोंदविता येतील. त्यानंतर 20 मे रोजी पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे.
शून्य फेरीमध्ये 8 ते 20 मे या कालावधीत नोंदणी, अर्जाचा भाग-1 सादर करणे, तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, हरकती व दुरुस्त्या स्वीकारणे, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे तसेच विविध कोट्यांतील रिक्त जागा निश्चित करून पहिल्या फेरीसाठी जागा प्रदर्शित करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
नियमित कॅप फेरी-1 अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-1 मधील दुरुस्ती आणि भाग-2 भरण्याची प्रक्रिया 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध असेल.
कॅप फेरी-1 ची अलॉटमेंट प्रक्रिया 23 ते 26 मे दरम्यान पार पडणार असून, 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होईल. तसेच एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात येणार आहे.
प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध होईल, तर 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.



