Home Cities मुक्ताईनगर कुऱ्हा महाविद्यालयाचे प्रा. सचिन जोशी यांना संगणक शास्त्रात पीएचडी

कुऱ्हा महाविद्यालयाचे प्रा. सचिन जोशी यांना संगणक शास्त्रात पीएचडी


 मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्थानिक कुऱ्हा महाविद्यालयाचे प्रा. सचिन नारायण जोशी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संगणक शास्त्र विभागातून “Designing of An Efficient Approach Using Web Content Mining Based Recommender System for Agriculture Domain” या विषयावर संशोधन पूर्ण करत यशस्वीरित्या आचार्य (PhD) पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रासोबतच कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रा. सचिन जोशी यांनी आपल्या संशोधनामध्ये कृषी क्षेत्रासाठी वेब कंटेंट मायनिंगवर आधारित कार्यक्षम रेकमेंडर सिस्टीम विकसित करण्यावर विशेष भर दिला. शेतकऱ्यांच्या गरजा, माहितीची उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लक्षात घेऊन त्यांनी तीन महत्त्वपूर्ण मॉड्यूल्सची निर्मिती केली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, बाजारभाव, कृषी सल्ला आणि भविष्यातील अंदाज यांसारखी उपयुक्त माहिती अधिक प्रभावी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.

संशोधन कालावधीत प्रा. जोशी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित जर्नल्समध्ये एकूण आठ संशोधनपत्रे प्रकाशित केली आहेत. त्यांच्या संशोधन कार्याला शैक्षणिक क्षेत्रातून मोठी दाद मिळाली असून पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय IEEE परिषदेत त्यांच्या संशोधनपत्राला “Best Paper Award” ने गौरविण्यात आले. याशिवाय कृषी मार्केट संदर्भातील एक डेटासेट आणि फोरकास्टिंगसाठी विकसित करण्यात आलेल्या अल्गोरिदमचे पेटंटही प्रकाशित झाले आहे.

या संशोधनासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संगणक शास्त्र विभागाचे डॉ. अविनाश बा. मनवर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. जोशी यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राचा संगम घडवून आणणारे संशोधन साकारले. कृषी क्षेत्रातील डेटा मायनिंग आणि रेकमेंडर सिस्टीमच्या वापरामुळे भविष्यात शेतकऱ्यांना निर्णय प्रक्रिया अधिक सोपी आणि अचूक होण्यास मदत मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रा. सचिन जोशी हे कुऱ्हा महाविद्यालयात कार्यरत असून त्यांच्या या यशाबद्दल प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था, कुऱ्हा यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्रजी फडके, सचिव भालचंद्रजी कुलकर्णी, कोषाध्यक्ष प्रल्हादजी बढे, पुंजाजी महाराज रायपुरे, श्री अभिनव इंग्लिश मेडियम स्कूल, स्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. पिंगळे तसेच प्राध्यापक वर्ग आणि संचालक मंडळातील सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आपल्या या यशाचे श्रेय प्रा. सचिन जोशी यांनी आई-वडील, कुटुंबीय, मार्गदर्शक डॉ. अविनाश मनवर, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांना दिले आहे.


Protected Content

Play sound