
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या मौल्यवान खुल्या भूखंडावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी असलेला हा भूखंड बळकावण्यासाठी रात्रीतून संरक्षण भिंती तोडून ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, ॲड. पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर प्रभावी युक्तिवाद करत आणि प्रत्यक्ष घटनास्थळी ठाम भूमिका घेतल्याने अखेर प्रशासनाला या ठिकाणी मनपाच्या मालकीचा फलक लावावा लागला.

हा भूखंड अनेक वर्षांपूर्वी नर्सिंग होम कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आला होता, परंतु तिथे कोणतेही बांधकाम न झाल्याने महानगरपालिकेने तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. मात्र, पार्किंगसाठी जागा मिळवण्याच्या उद्देशाने ‘लँड माफिया’ पद्धतीचा वापर करत रात्रीतून या जागेची संरक्षण भिंत तोडण्यात आली आणि तिथे जेसीबी लावून अनधिकृत काम सुरू करण्यात आले. ही बाब निदर्शनास येताच ॲड. पियुष पाटील यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आणि या प्रकरणाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
कारवाई दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांनी ही जागा वादात असल्याचे सांगून खोटा बनाव रचला होता. मनपाचे अधिकारी कागदपत्रांअभावी बाजू मांडताना अडखळत असताना, ॲड. पियुष पाटील यांनी स्वतःकडील पुराव्यांच्या आधारे जोरदार युक्तिवाद केला आणि प्रशासनाला माघार घेण्यास भाग पाडले. अखेर मनपाने या जागेवर आपला हक्क सांगणारा बोर्ड लावून ताबा निश्चित केला आहे. या कारवाईमुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील एक महत्त्वाचा भूखंड सुरक्षित झाला आहे.



