Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात ९ मे रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत

जळगाव जिल्ह्यात ९ मे रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दि.९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारे खटले, त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय आणि आर्थिक चणचण टाळण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी ही लोकअदालत पार पडणार आहे.

जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या लोकअदालतीचा प्रारंभ होईल. या उपक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे. ]या लोकअदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॅफिक चालान, धनादेश अनादर (Cheque Bounce), वैवाहिक वाद, मोटार अपघात खटले, दिवाणी व फौजदारी प्रकरणे आणि ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड शक्य आहे, असे सर्व प्रलंबित व दाखलपूर्व खटले निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

लोकअदालतीचे अनेक फायदे असून यामध्ये साक्षी पुरावा किंवा दीर्घ युक्तिवादाची आवश्यकता नसते, त्यामुळे निकाल झटपट लागतो. ]येथे होणारा निवाडा हा परस्पर संमतीने होत असल्याने कोणाचाही पराजय होत नाही आणि पक्षकारांमधील कटुता संपून वेळ व पैशांची बचत होते. ]विशेष म्हणजे, लोकअदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये नियमानुसार भरलेली कोर्ट फी देखील परत मिळते. याशिवाय राष्ट्रीयीकृत बँका, विमा कंपन्या आणि भ्रमणध्वनी कंपन्यांनी देखील थकीत रकमांमध्ये सवलत देण्याचे प्रस्तावित केले आहे.

जळगाव येथील जिल्हा न्यायालयासोबतच औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोडपात्र प्रकरणे देखील या लोकअदालतीत निकाली काढली जाणार आहेत. ]ज्या पक्षकारांना आपले खटले निकाली काढायचे आहेत, त्यांनी आपल्या विधीज्ञांसह उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.तसेच ज्यांनी आधी नाव नोंदवले नाही, अशा पक्षकारांनाही ऐनवेळी आपले खटले तडजोडीसाठी ठेवण्याची संधी देण्यात आली आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी या राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.


Protected Content

Play sound