अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील जगप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिराने धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाची सांगड घालत एक नवा इतिहास रचला आहे. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे विकसित करण्यात आलेला, मंदिराच्या संपूर्ण आभासी दिव्यदर्शनाची अनुभूती देणारा ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ (व्हीआर) प्रकल्प आता भाविकांच्या सेवेत रुजू झाला आहे. बुधवार, ६ मे रोजी आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, अशा प्रकारची प्रगत ‘व्हीआर’ यंत्रणा कार्यान्वित करणारे श्री मंगळग्रह मंदिर हे देशातील एकमेव मंदिर ठरले असून, तंत्रज्ञानाधारित धार्मिक पर्यटनाच्या दिशेने हे एक क्रांतीकारी पाऊल मानले जात आहे.
या ऐतिहासिक क्षणी आमदार अनिल पाटील यांनी विधिवत पूजा करून या प्रकल्पाचे लोकार्पण केले. श्री मंगळग्रह मंदिराने यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) यंत्रणा कार्यान्वित करून देशातील पहिले ‘एआय मंदिर’ होण्याचा मान मिळवला होता. आता ‘व्हीआर’ तंत्रज्ञानामुळे जगभरातील भाविकांना आणि पर्यटकांना प्रत्यक्ष मंदिरात न येताही घरबसल्या मंदिराचा परिसर, गाभारा आणि विविध देवतांच्या स्थानांचे ३६० अंशात दर्शन घेता येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच अनिल शिसोदे, कामगार नेते एल. टी. नाना पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर यांसह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळग्रह सेवा संस्थेने विकसित केलेल्या या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, भाविकांना कोणताही वेगळा मोबाईल ॲप डाऊनलोड न करता केवळ एका लिंकच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या परस्परसंवादी स्पर्शपटल (Touch Screen) केंद्राद्वारे देखील भाविक हा अनुभव घेऊ शकतात. यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ध्वनी मार्गदर्शनाची (Audio Guide) सोय करण्यात आली आहे. यामुळे वृद्ध भाविक, दिव्यांग नागरिक तसेच परदेशातील भारतीय नागरिकांना मंदिराच्या सविस्तर माहितीसह दर्शनाचा लाभ घेणे सुलभ झाले आहे.
हा संपूर्ण प्रकल्प ‘इम्पॅक्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित तंत्रज्ञान कंपनीने विकसित केला आहे. ड्रोन फोटोग्रॅमेट्री, ३६० अंशीय स्कॅनर आणि प्रगत त्रिमितीय रेंडरिंग तंत्रज्ञानाचा वापर करून मंदिर परिसराची हुबेहूब डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या डिजिटल भ्रमंतीमध्ये मार्गदर्शित आणि स्वयंसंचलित असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे पर्यटकांना त्यांच्या प्रवासाचे उत्तम नियोजन करता येईल. तसेच, या यंत्रणेच्या मदतीने भविष्यात मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे आणि वाहनांचे व्यवस्थापन करणे अधिक सोपे होणार आहे.



