पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या अमानवीय घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून, आरोपी भीमराव कांबळे याला तात्काळ भरचौकात फासावर लटकवावे, अशी आग्रही मागणी पाचोरा येथील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा नराधमांना समाजात स्थान नसावे, असा संतप्त सूर महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज ७ मे २०२६ रोजी पाचोरा येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की, सदर प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवून नराधमाला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून त्या पीडित चिमुकलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.

निवेदन देते प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख ललिता पाटील, उपजिल्हाप्रमुख वंदना पाटील, मंदा पाटील, उपजिल्हा समन्वयक बेबा पाटील, सुनंदा महाजन, उपजिल्हा संघटक सुष्मा पाटील, तालुका संघटक प्रिती सोनवणे, शहर प्रमुख मंदाकीनी पारोचे, अनिता पाटील, नगरसेविका वर्षा ब्राम्हणे आणि मनिषा बाविस्कर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या घटनेमुळे महिला वर्गात तीव्र संतापाची लाट असून, आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी देखील या निषेध आंदोलनास आणि मागणीस आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला असल्याचे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवून असून, पोलीस प्रशासनाला कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नराधमाला नक्कीच फासावर लटकविण्यात येईल, असा ठाम विश्वास शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.



