Home Uncategorized मुक्ताईनगर नगरपंचायतीचा भोंगळ कारभार उघड; प्रभाग १३ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य, नागरिकांचा संताप

मुक्ताईनगर नगरपंचायतीचा भोंगळ कारभार उघड; प्रभाग १३ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य, नागरिकांचा संताप


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना अस्वच्छतेच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून गेल्या पाच दिवसांपासून कचरा संकलनाची गाडी गल्लीमध्ये फिरकली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाढत्या घाणीमुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपंचायत प्रशासन केवळ कर वसुलीत व्यस्त असून मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. परिसरातील गटारींची सफाई करण्यात आली असली तरी त्यातील कचरा रस्त्यावरच टाकून देण्यात आला आहे. मात्र तो उचलण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी परिसरात माशा, डास आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रभागातील अनेक गटाऱ्या फुटलेल्या अवस्थेत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडे उगवलेली दिसत आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून रस्त्यावर घाण साचत आहे. पावसाळ्यापूर्वीच अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या अस्वच्छतेचा मोठा फटका बसत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

“आम्ही फक्त टॅक्स भरण्यासाठीच नागरिक आहोत का?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली केवळ दिखावा सुरू असून प्रत्यक्षात नगरपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमित कचरा संकलन, गटारींची दुरुस्ती आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागरिकांनी तातडीने कचरा उचलून फुटलेल्या गटाऱ्यांची दुरुस्ती करावी तसेच नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा नगरपंचायत प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे मुक्ताईनगरकरांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound