Home Cities बोदवड शिरसाळा परिसरात वारंवार वीज खंडित; महावितरणविरोधात नागरिकांचा संताप

शिरसाळा परिसरात वारंवार वीज खंडित; महावितरणविरोधात नागरिकांचा संताप


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाळा परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसातून अनेक वेळा वीज ये-जा होत असल्यामुळे घरगुती जीवन विस्कळीत झाले असून, उकाड्याच्या दिवसांत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाळा तसेच चिंचखेड-कोल्हाडी परिसरात दर अर्ध्या-अर्ध्या तासाने वीज पुरवठा खंडित होत आहे. या वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे घरातील विद्युत उपकरणे जळण्याच्या घटना घडत असून, ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

महावितरण विभागाच्या निष्काळजी व मनमानी कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः सध्या सुरू असलेल्या तीव्र उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना सर्वाधिक फटका बसत आहे. उकाड्यामुळे घरात राहणेही कठीण झाले असून नागरिकांचा संयम सुटत चालल्याचे चित्र दिसत आहे.

किरकोळ कारणांवरून दिवसातून आठ ते दहा वेळा वीज बंद होत असल्याने लोकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. दरम्यान, वीज बिल थकले तर तत्काळ पुरवठा खंडित करणारे महावितरण स्वतःच्या सेवेमध्ये मात्र गांभीर्य दाखवत नसल्याची टीका नागरिकांनी केली आहे. यामुळे “न्याय मागायचा तरी कुणाकडे?” असा सवालही उपस्थित होत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच महावितरण प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

 


Protected Content

Play sound