Home Uncategorized जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव बसस्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. हातचलाखी करून अंगठी व रोख रक्कम लंपास करणाऱ्या या आरोपींना तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

घडलेल्या प्रकारानुसार, २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गजानन विठोबा सप्रे (वय ६५, रा. जिल्हा बँक कॉलनी, जळगाव) हे बसस्थानक परिसरात उभे असताना एका इसमाने त्यांच्याशी शेगाव बसबाबत बोलत संवाद साधला. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारासह फिर्यादीला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने ‘शनीदोष काढून देतो’ असे सांगत त्यांची अंगठी व रोख रक्कम काढून घेतली आणि दोघेही पसार झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील असल्याची माहिती समोर आली.

यानुसार पोलिसांनी सापळा रचून अल्ताफ हसन मदारी (वय ३२) आणि मोहसिन जावेद मदारी (वय ३१) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावत आरोपींना अल्पावधीत जेरबंद केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सपोनि अतुल वंजारी, पोहेकॉ. विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोना. किशोर पाटील, पो.अ. राहुल रगडे, रवींद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गोविंद पाटील तसेच पाचोरा पो.स्टे. चे पोहेकॉ. दिनेश पाटील व जळगाव RPF चे अंमलदार पंकज वाघ’ तसेच नेत्रमचे अंमलदार मुबारक देशमुख, पंकज खडसे, कुंदनसिंग बयास, आदींच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound