Home Cities जळगाव गुन्हेगारीपासून अपघातापर्यंत… प्रत्येक संकटात जळगावकरांचा ‘डायल ११२’ वर विश्वास!

गुन्हेगारीपासून अपघातापर्यंत… प्रत्येक संकटात जळगावकरांचा ‘डायल ११२’ वर विश्वास!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव: कोणतेही संकट असो किंवा तातडीची मदत हवी असो, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी ‘डायल ११२’ हा क्रमांक आता आधारवड ठरत आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या केवळ चार महिन्यांच्या कालावधीत जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘डायल ११२’ प्रणालीवर तब्बल १२ हजार २४१ कॉल्स प्राप्त झाले आहेत. या आकडेवारीवरून पोलीस दलाची सक्रियता आणि नागरिकांचा वाढता विश्वास अधोरेखित होत आहे.

महिलांच्या तक्रारींचे प्रमाण मोठे :
प्राप्त माहितीनुसार, या चार महिन्यांत सर्वाधिक ३,३१२ कॉल्स हे गुन्हेगारी घटनांशी संबंधित होते. मात्र, चिंतेची आणि तितकीच दिलासादायक बाब म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात २,९८६ कॉल्स आले आहेत. संकटसमयी महिला न घाबरता पोलिसांशी संपर्क साधत असल्याचे यातून स्पष्ट होते. याशिवाय, १४३५ नागरिकांनी वैयक्तिक संकट किंवा त्रासावेळी पोलिसांना साद घातली आहे.

विविध घटनांचा तातडीने निपटारा :
जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघात (३६९), चोरी (४५८) आणि शाब्दिक वादाच्या (४५९) घटनांमध्येही ‘डायल ११२’ ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ४६३, तर बालकांच्या संरक्षणासाठी २२२ कॉल्स आले. अगदी प्राण्यांशी संबंधित समस्या असो वा आगीच्या घटना, पोलिसांनी प्रत्येक कॉलची दखल घेत मदत पोहोचवली आहे.

दक्षता आणि प्रतिसाद :
जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता उल्लंघन (२८) आणि नैसर्गिक आपत्तीच्या (१) घटनांचीही नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता व्यक्ती (६७) आणि संशयास्पद हालचालींबाबतही नागरिकांनी सतर्कता दाखवली आहे. एकूण १२,२४१ कॉल्सपैकी प्रत्येक कॉलवर पोलिसांनी दिलेल्या त्वरित प्रतिसादामुळे अनेक गंभीर गुन्हे टळले असून पीडितांना वेळेत न्याय मिळाला आहे. जळगाव पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा, पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.


Protected Content

Play sound