जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवार, ४ मे रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत अतिक्रमण, स्वच्छता, मनपा शाळांची स्थिती आणि डिझेल खरेदी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर जोरदार चर्चा रंगली. सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधले.
महापालिका राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमण हटवते, मात्र शहरातील सुभाष चौक, महात्मा फुले मार्केट परिसरात अतिक्रमण वाढत असल्याचा मुद्दा सभागृहात गाजला. शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी प्रशासनाच्या शेजारी भरत असलेल्या संडे बाजारामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. रविवारी रस्त्यांवर चालणेही कठीण होते, असे सांगत त्यांनी सुटीच्या दिवशीही अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. यावर उपायुक्त पंकज गोसावी यांनी रविवारीही गस्ती पथक तैनात करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

मंदिर परिसरातील अतिक्रमणाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला फोनद्वारे सूचना दिल्यानंतरही जैन मंदिराभोवती अतिक्रमण कायम असल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला. “मुख्यमंत्र्यांचा फोन येऊनही कारवाई होत नसेल तर आम्ही आंदोलन करायचे का?” असा सवाल करत भंगाळे यांनी प्रशासनावर टीका केली. तसेच सुटीच्या दिवशी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद राहत असल्याने नागरिकांनी तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी शहरातील रिक्षा चालकांच्या मनमानीवरही बोट ठेवले. अधिकृत थांबे असूनही रिक्षा चालक रस्त्यावरच वाहन उभे करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, असे त्यांनी नमूद केले. काही रिक्षा चालकांची नोंदणी नसल्यामुळे समस्या अधिक गंभीर होत असल्याचे सांगत या चालकांना शिस्त लावण्याची मागणी करण्यात आली.
पावसाळा तोंडावर आला असताना नालेसफाईचे नियोजन अद्याप पूर्ण झाले नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागाकडून प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला असून, येत्या दोन-तीन दिवसांत टेंडर काढून कामाला सुरुवात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील मनपा जागांवर चालणाऱ्या काही खासगी शाळांनी करार संपल्यानंतरही त्या जागांवर प्रवेशासाठी पैसे गोळा केल्याचा आरोप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केला. सेंट जोसेफ, उज्वल स्कूल आणि विद्या इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांच्या कराराचा मुद्दा त्यांनी उपस्थित करत कारवाईची मागणी केली. तसेच कचरा संकलनात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. यावर आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी बीव्हीजी कंपनीवर आतापर्यंत ५४ लाखांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती दिली.
मनपा शाळांमधील घटती पटसंख्या हा मुद्दाही चर्चेत राहिला. शाळांची इमारत आणि सुविधा चांगल्या असूनही विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. शिक्षणाचा दर्जा उंचावून पालकांचा कल मनपा शाळांकडे वळविण्याची गरज असल्याचे सदस्यांनी नमूद केले. यावेळी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आगामी शैक्षणिक वर्षापासून मनपा शाळांमध्ये सेमी इंग्लिश माध्यम सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली.
दरम्यान, इंधन भरणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्याने सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देत इंधन खर्चाबाबत सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
या बैठकीला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, पंकज गोसावी, धनश्री शिंदे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, नगरसचिव सतीश शुक्ला यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.



