बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यात आज अन्नदाता संघर्ष पदयात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला. सातबारा कोरा करण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत ही पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असून, यात मोठ्या संख्येने शेतकरी आणि युवक सहभागी झाले आहेत.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या पदयात्रेला जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथून सोमवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. तब्बल १७ किलोमीटरचा प्रवास करत ही पदयात्रा जळगाव जामोद शहरात पोहोचणार असून, तेथे जाहीर सभेद्वारे समारोप होणार आहे. या पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

पदयात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, शेतीमालाला हमीभाव देणे, बेरोजगारीचा प्रश्न सोडवणे आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही संघर्ष पदयात्रा काढण्यात आली असून, सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पदयात्रेबाबत माहिती देताना काँग्रेस नेते संदीप शेळके यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि युवकांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे करण्याचा हा प्रयत्न असून, पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद हा सरकारसाठी इशारा आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पदयात्रेदरम्यान विविध ठिकाणी थांबे घेऊन नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी, कर्जबाजारीपणा आणि रोजगाराच्या समस्यांवर सविस्तर चर्चा होत असून, सरकारच्या धोरणांवरही टीका करण्यात येत आहे. सहभागी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत आपल्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या पदयात्रेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, येत्या काळात शेतकरी प्रश्नावर आणखी तीव्र आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव जामोद येथे होणाऱ्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



