जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या डिजिटल मीडिया विभागाच्या जळगाव महानगर अध्यक्षपदी पत्रकार विक्रम कापडणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार तसेच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. संघटनेच्या डिजिटल माध्यमातील कार्याला गती देण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून विक्रम कापडणे यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

विक्रम कापडणे यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात ऑफलाइन माध्यमांच्या काळात जळगावमधील स्थानिक केबल वाहिनी ‘साई व्हिजन’ अंतर्गत ‘बालाजी न्यूज’ चॅनेलपासून केली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस फोटोग्राफी यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय अनुभव संपादन केला आहे. सध्या ते ‘लोक टाइम न्यूज’ या वेब पोर्टलचे संपादक म्हणून कार्यरत असून, डिजिटल पत्रकारितेत सक्रिय योगदान देत आहेत.
ही नियुक्ती आजपासून पुढील ११ महिन्यांसाठी लागू राहणार असून, या कालावधीत कापडणे हे डिजिटल मीडिया विभागाचे नेतृत्व करणार आहेत. संघटनेच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करताना पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी नियुक्तीपत्राद्वारे कापडणे यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या नियुक्तीमुळे जळगाव महानगरातील डिजिटल पत्रकारितेला बळ मिळेल आणि संघटनेच्या कार्याला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



