अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सलग कारवायांमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसांत झालेल्या दुसऱ्या कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने घेतलेली आक्रमक भूमिका अधोरेखित झाली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र देविदास पवार (वय ४८, रा. नगाव बु., ता. अमळनेर, जि. जळगाव) यांनी कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या चुलत भावाला १५ व्या वित्त आयोगांतर्गत सुमारे १२ लाख रुपयांची सी.सी. गटार बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविण्याची दोन कामे मिळाली होती. या कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपीने एकूण रकमेच्या ७ टक्केप्रमाणे सुरुवातीला ८४ हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले.

या प्रकरणी तक्रारदाराने ३० एप्रिल रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून पंचांसमक्ष पडताळणी केली असता आरोपीने यापूर्वी १३ हजार रुपये ऑनलाइन (फोनपे) द्वारे स्वीकारल्याची कबुली दिली. पुढे तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारताना आरोपीला अमळनेर शहरातील केलेनगर येथील त्याच्या राहत्या घरी रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अमळनेर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षण केले असून, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा अधिकारी म्हणून भूमिका पार पाडली. पुढील तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही कारवाईत सहभाग नोंदविला.



